Maharashtra Weather | हवामानात फेब्रुवारीअखेर मोठे बदल; महाराष्ट्रात तापमानवाढीचा इशारा; हवामान खात्याचा अंदाज काय?
पुणे : Maharashtra Weather | राज्यात पुन्हा एकदा तापमान वाढीची चिन्हे दिसू लागली आहेत. भारती हवामान विभागाने २७ फेब्रुवारी रोजी तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या सकाळच्या वेळेत गारवा जाणवत असला तरी दुपारनंतर उन्हाचा तीव्रपणा वाढताना दिसत आहे. विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण पट्ट्यात तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पारा ३२ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेरीसच उन्हाळ्याची तीव्र चाहूल लागणार असल्याचे चित्र आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आकाश बहुतांश ठिकाणी निरभ्र राहील. पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने थेट सूर्यप्रकाशामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवेल. दिवसभर कोरडे आणि उष्ण वातावरण राहण्याची शक्यता असून, पुढील काही दिवस तापमान उच्च पातळीवर टिकून राहू शकते.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारच्या वेळी अनावश्यक बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, हलकी व सैलसर कापडांची वस्त्रे वापरावीत तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उष्माघातासारख्या समस्या टाळण्यासाठी शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
