Maharashtra Weather | थंडी-उन्हाचा लपंडाव कायम; 17 फेब्रुवारीपासून पावसाचे संकेत, महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा बदल

Maharashtra Weather Alert

मुंबई :  Maharashtra Weather | महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच हवामानाचा विचित्र खेळ सुरू आहे. पहाटे गारवा, सकाळी आल्हाददायक वातावरण आणि दुपारी उन्हाचा चटका असा दिवसाचा पूर्ण बदल नागरिक अनुभवत आहेत. मात्र, आता हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत राज्याच्या हवामानात पुन्हा बदल होणार असून १७ ते १८ फेब्रुवारीदरम्यान काही भागांत हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सध्या उत्तर-पश्चिम दिशेकडून थंड व कोरडे वारे राज्याकडे वाहत आहेत. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात साधारण एक ते दोन अंशांनी घट होऊ शकते. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात रात्रीचा गारवा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी राजस्थान व गुजरातमध्ये वाढलेल्या तापमानाचा परिणाम उत्तर महाराष्ट्रावर जाणवत होता; मात्र वाऱ्यांची दिशा बदलल्याने उष्णतेचा प्रभाव कमी होईल आणि हवामान तुलनेने सुखद राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. १३ आणि १४ फेब्रुवारीदरम्यान बहुतांश भागात आकाश निरभ्र राहणार असल्याने ऊन असेल, पण ते तीव्र जाणवणार नाही.

दरम्यान, १७ व १८ फेब्रुवारीदरम्यान नवीन वेस्टर्न डिस्टरबन्स सक्रिय होणार आहे. या प्रणालीमुळे अरबी समुद्रातून येणारे आर्द्र वारे मध्य भारताकडे सरकतील. परिणामी उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भाच्या सीमाभागात ढगाळ वातावरण तयार होऊन काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात मात्र पावसाची शक्यता कमी असून, हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. तरी किनारपट्टी भागात आर्द्रता वाढल्याने दमट उष्णता जाणवू शकते.

या बदलत्या हवामानाचा शेतीवर परिणाम होऊ शकतो. ढगाळ वातावरण व हलका पाऊस झाल्यास पिकांवर कीड-रोग वाढण्याची शक्यता असते. काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.

एकंदरीत, पुढील काही दिवस महाराष्ट्रात सकाळी गारवा, दिवसा सौम्य ऊन आणि १७-१८ फेब्रुवारीदरम्यान काही भागांत हलका पाऊस, असा बदलता हवामानाचा अनुभव राज्याला येणार आहे.

You may have missed