Maharashtra Weather | उष्णतेचा चटका अन् अवकाळी पावसाची सर; महाराष्ट्रातील बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत

Maharashtra Weather

मुंबई :  Maharashtra Weather | राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसच उन्हाचा तीव्र चटका जाणवू लागला असतानाच अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. एका बाजूला तापमान झपाट्याने वाढत आहे, तर दुसऱ्या बाजूला ढगाळ वातावरण आणि हलक्या ते मध्यम सरींमुळे हवामानात अनिश्चितता निर्माण झाली आहे. या बदलत्या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि कोकण किनारपट्टी भागात दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता वाढलेली दिसत आहे. काही ठिकाणी तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत. फेब्रुवारीतच एप्रिल-मेची चाहूल लागावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात अचानक बदल झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण तयार झाले असून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. लातूर, नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली भागातही वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या अनिश्चित हवामानामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात आहेत. गहू, हरभरा, कांदा यांसारखी पिके काढणीच्या उंबरठ्यावर असताना अचानक आलेल्या पावसामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे. अवकाळी पावसासोबत गारपीट किंवा जोरदार वारे आल्यास पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. गेल्या काही वर्षांत हवामानातील अशा अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे.