Maharashtra Weather | शिमग्याआधीच वारं फिरलं! उष्णतेचा तडाखा वाढणार; हवामान विभागाचा महाराष्ट्राला इशारा
पुणे : Maharashtra Weather | राज्यात शिमग्याआधीच उन्हाचा जोर वाढू लागला असून, २८ फेब्रुवारी रोजी उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात कोरडे व उष्ण हवामान राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. बहुतांश भागांत पावसाची कोणतीही शक्यता नसून, तापमान सामान्यपेक्षा २ ते ४ अंश सेल्सिअसने जास्त राहू शकते.
महाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. कोकण किनारपट्टी भागात उष्ण व दमट वातावरण जाणवणार असून, दिवसाचे तापमान २९ ते ३१ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह परिसरात आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवेल. पुणे आणि मध्य महाराष्ट्रात तापमान ३१ ते ३३ अंशांपर्यंत जाऊ शकते, त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा अधिक तीव्र राहील.
विदर्भ आणि मराठवाडा या भागांत तर तापमान ३४ ते ३७ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. विशेषतः विदर्भात उष्णतेची लाट सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. शेतकरी आणि मैदानी काम करणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या कडक उन्हात अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिऊन शरीरात द्रवपदार्थांची कमतरता होऊ देऊ नये, हलके व सैल कपडे वापरावेत आणि लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
