Maharashtra Weather Update | पश्चिम महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; पुण्यात हवामान चांगले राहण्याची शक्यता

पुणे : Maharashtra Weather Update | राज्यात अवकाळी सकंट वाढले असून, चार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
पुढील 24 तासात पुण्यातील हवामान (Pune Weather) चांगले राहण्याची शक्यता आहे. येथील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके राहील. पुण्यात 48 तासात पावसाची शक्यता नसली, तरी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी बरसण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात मार्चअखेर हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरमध्ये पुढील चार दिवस ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. वातावरण दमट झाल्याने उष्णतेने त्रस्त असलेल्या लोकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळेल. तथापि, शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शनिवारी हवामान खात्याने राज्यात चार जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.
सांगलीत उकाडा वाढला असून, कमाल तापमान 38, तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील. दुपारनंतर पावसाचे वातावरण होऊन संध्याकाळी विजांचा कडकडाटासह पाऊस पडेल. पुढील चार दिवस सांगलीमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
साताऱ्यात रात्री वीजांच्या गडगडाटासह पाऊस पडेल. सोलापूर जिल्ह्यात पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोल्हापुरातील कमाल तापमान 38 अंश, तर किमान तापमान 23 अंशावर राहील. आज दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.