Maharashtra Weather Update | कुठे ऊन तर कुठे पाऊस! ‘या’ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, 10 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज

Rain

नागपूर : Maharashtra Weather Update | राज्यासह देशात हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. एकिकडे काही ठिकाणी उष्णतेच्या तीव्र झळा जाणवत असताना, काही ठिकाणी अवकाळीच्या पावसाचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात येत आहे. रविवारी नागपूरसह अनेक शहरांमध्ये तापमानाने ४४ अंशांचा टप्पा ओलांडला. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत होत असून, हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम ठेवला आहे.

एका बाजूला राजस्थान, गुजरातसह पश्चिम भारतात उष्णतेची लाट तीव्र होत असून, दुसऱ्या बाजूला केरळ, तामिळनाडू आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी विविध राज्यात यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

पश्चिम राजस्थान आणि गुजरातमधील सौराष्ट्र-कच्छ भागात उष्णतेची लाट ७ ते ९ एप्रिलदरम्यान अधिक तीव्र होईल. या भागांत काही ठिकाणी ४५ अंश सेल्सिअसहून जास्त तापमान नोंदवले गेले असून, बारमेर आणि कांडला ही देशातील सर्वाधिक तापमानाची ठिकाणे ठरत आहेत. यामुळे ७ व ८ एप्रिलसाठी रेड अलर्ट, तर ९ एप्रिलसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.

दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंदीगड, पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशातही तापमान झपाट्याने वाढत असून, १० एप्रिलपर्यंत या भागांत उष्णतेची लाट कायम राहील. यासाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट दिले गेले आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उष्ण हवामानामुळे या भागांतील नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे.

महाराष्ट्रात बदलती परिस्थिती…

पालघर, रायगड, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला अमरावती, नागपूरमध्ये बुधवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. तर महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट आहे. ११ आणि १२ एप्रिलला पुन्हा एकदा अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, जिल्ह्यात गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

You may have missed