Maharashtra Weather Update | विजांच्या कडकडाटासह आज वादळी पावसाची शक्यता; पुणे, सातारा जिल्ह्यास ‘ऑरेंज अलर्ट’

Rains

पुणे ः Maharashtra Weather Update | एप्रिल महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने झाली. पुढील चार दिवस राज्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने (India Meteorological Department) वर्तवला आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांना ‘ऑरेंज’, तर ३० जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान, एप्रिलमध्ये ८८ ते ११२ टक्के अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील २४ तासांसाठी पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह वळवाच्या पावसाची शक्यता आहे. बुधवारी, आज दोन्ही जिल्ह्यांतील कमाल तापमान ३४ अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान ३४ अंश, तर किमान २३ अंश सेल्सिअस इतके राहील. जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिले असून, सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कमाल तापमान ३५ अंश, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस इतके राहील. विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह आज मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच शुक्रवारपर्यंत यलो अलर्ट कायम असणार आहे. सोलापुरात दिवसभरच्या वाढत्या तापमानानंतर संध्याकाळी पावसाचे वातावरण तयार होईल.

दरम्यान, बुधवारी (२ एप्रिल) कोल्हापूर जिल्ह्यात १ मि.मी., सांगली व सातारा जिल्ह्यात २ ते ३ मि.मी., सोलापूर जिल्ह्यात २ मि.मी. पुणे जिल्ह्यात १० मि.मी. पावसाची शक्यता राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० कि.मी. राहील. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपणार आहे.

You may have missed