Maharashtra Weather Update | येत्या आठवड्यात अवकाळीचे संंकट; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना सर्वाधिक धोका, हवामान खात्याचा अंदाज काय?

rain (1)

मुंबई ः पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Weather Update | राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस ओलांडले आहे. काही ठिकाणी तापमान ४० अंशांवर पोहोचले आहे. दरम्यान, आता येत्या आठवड्यात राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, ३ मे ते १० मे दरम्यान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहील, जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी येतील.

कोकण, खानदेश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांत पुढील काही दिवस वातावरणात ढगाळपणा जाणवेल. या भागात एखाद्या दिवशी विजांचा गडगडाट आणि गारपिटीसह किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबईत सकाळी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तर दुपारी हवामान स्वच्छ राहील. ढगाळ हवामानामुळे कोकण किनाऱ्यावर हवेत थंडी पडण्याची शक्यता आहे. तथापि, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.

हवामान तज्ज्ञांच्या मते, “सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट नाही आणि रात्रीही जास्त उष्णता नाही. तथापि, शनिवारपासून पुढील आठवड्यात कमाल तापमान सुमारे दोन अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे उष्णतेची लाट काही प्रमाणात कमी होईल.” विदर्भातील काही भागात सध्या उष्ण हवामान आहे आणि गडचिरोली, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा परिणाम अधिक जाणवत आहे.

You may have missed