Maharashtra Weather Update | विदर्भ जळतंय! तापमान तब्बल ४४ अंशावर, ‘या’ जिल्ह्यांनाही हवामान खात्याचा अलर्ट

नागपूर : Maharashtra Weather Update | सध्या विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा पारा हा ४४ अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. पश्चिम विदर्भातील जिल्ह्यात पुढच्या दोन दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
मार्च महिन्यात देखील राज्यभर सरासरीच्या अधिक तापमानाची नोंद झाल्याची माहिती नागपूर वेध शाळेच्या संचालकांनी दिली. अशातच बुधवारी (९ एप्रिल) आणि गुरुवारी (१० एप्रिल) विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे.
नागपूर प्रदेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी (७ एप्रिल) राज्यात अकोल्यामध्ये सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुजरात आणि राज्यस्थान मार्गे उष्ण वारे हे उष्ण व कोरडे असल्याने राज्यातील तापमान झपाट्याने वाढत असल्याचे नागपूर वेध शाळेचे महासंचालक बी सुब्रमण्यम यांनी सांगितले.
दरम्यान, नागपूर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी (Municipal Corporation Commissioner Dr. Abhijit Chaudhary) यांनी सांगितले की, सध्या नागपूरचा पारा ४२ अंश सेल्सिअस वर गेला आहे. पुढील काळात तो ४५ अंश सेल्सियाच्या वर जाण्याची शक्यता आहे. यावर्षी उन्हाळा हा अधिक उष्ण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नागपूर महापालिकेने आपल्या नागरिकांच्या सुरक्षितेसाठी हिट अॅक्शन प्लॅन तयार केला आहे.