Manikrao Kokate | ‘मी एक रुपयाचीही रमी खेळलेली नाही’; राजीनाम्याबाबत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले…

मुंबई ः पोलीसनामा ऑनलाईन – Manikrao Kokate | विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वादात सापडलेले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची बरीच चर्चा होती. मात्र, ही चर्चा निष्प्रभ ठरली आहे. कारण माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी (२२ जुलै) नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी खुलासा केला आहे.
माणिकराव कोकाटे म्हणाले की, मी खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे, तो इतका लांबला का ते माहिती नाही. ऑनलाईन रमी हा प्रकार तुम्हाला माहिती नाही का, तो खेळण्यासाठी त्याला मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट जोडावा लागतो. माझा असा कोणताही मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट ऑनलाईन रमीच्या अॅप्लिकेशनला जोडलेला नाही. कुठेही चौकशी करा, ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे, तेव्हापासून मी एक रुपयाची रमी खेळली नाही. किंबहुना मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप बिनबुडाचा आहे.
पुढे ते म्हणाले की, माझी महाराष्ट्रात बदनामी झाली आहे. कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आहे, ज्यांनी माझी बदनामी केली आहे, त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय मी राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
कृषी विभागाच्या एका नव्या योजनेची घोषणा
या वेळी माणिकराव कोकाटे यांनी कृषी समृद्धी या नव्या योजनेचे लाँचिंग करत असल्याचे जाहीर केले. शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाच हजार कोटींची भांडवली गुंतवणूक करण्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. मात्र, त्याचा जीआर निघणे बाकी होते, तो आज निघाला, असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. यानंतर कोकाटे यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेसंदर्भात भाष्य केले. या वेळी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला.