MP Sanjay Raut | प्रचारबंदी मोडून सत्ताधाऱ्यांना ‘मोकळीक’; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
मुंबई : MP Sanjay Raut | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर थेट आणि तीव्र शब्दांत टीका करत गंभीर आरोप केले आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारबंदी लागू असताना आयोगाने सत्ताधारी पक्षांना घरोघरी जाऊन पैसे वाटण्याची मुभा दिल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतरही सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचत असून, हे सरळसरळ नियमांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राऊत यांचे म्हणणे आहे की, प्रचारबंदीच्या काळात कोणत्याही पक्षाला मतदारांशी संपर्क साधण्यास मनाई असते. मात्र आज सत्ताधारी पक्षांना ‘विशेष सवलत’ देण्यात आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, निवडणूक आयोगानेच हा मार्ग मोकळा करून दिल्याचा आरोप त्यांनी केला. “हे म्हणजे सत्ताधाऱ्यांना तिळगुळ देण्यासारखं आहे. निवडणूक आयोगाने निष्पक्ष राहण्याऐवजी एका बाजूला झुकल्याचं हे स्पष्ट उदाहरण आहे,” अशी टीका त्यांनी केली.
सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते मतदारांमध्ये पैसे वाटत असल्याचे आरोप होत असताना, आयोगाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असेही राऊत यांनी नमूद केले. निवडणुका स्वच्छ, निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात व्हाव्यात, ही आयोगाची जबाबदारी असताना अशा प्रकारची मोकळीक देणे म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांशी तडजोड असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या विधानांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
