MPSC Exam News | आरक्षणाचा गोंधळ मिटवा अन् परीक्षा पुढे ढकला; एमपीएससी उमेदवारांची मागणी

mpsc

पुणे ः MPSC Exam News | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी आरक्षणाच्या तांत्रिक गोंधळावर स्पष्टता आणावी. त्याचबरोबर मुख्य परीक्षेला पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी पात्र उमेदवारांकडून करण्यात आली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा २६, २७ आणि २८ एप्रिलला होणार आहे. मात्र, ही मुख्य परीक्षा किमान पंधरा दिवस पुढे ढकलण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २६ ते २८ एप्रिल दरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी सुमारे सात हजार उमदेवार पात्र ठरले आहेत. मात्र, आतापर्यंत दोन हजार उमेदरावांनीच अर्ज दाखल केले आहेत. बाकी उमेदवार हे आरक्षणातील त्रुटीमुळे अर्ज करू शकले नाहीत. आरक्षणातील तांत्रिक बिघाडांमुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाहीत. त्यामुळे यावर स्पष्टता यावी, अशी मागणी उमेदवारांची आहे.

दरम्यान, १२ मार्चला जाहीर झालेल्या पूर्व परीक्षेच्या निकालात प्रवर्गाबाबत त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर एमपीएससीने २९ मार्चला सुधारित निकाल प्रसिद्ध केला आहे. या सुधारित निकालाच्या आधारे आणखी ३१८ उमेदवारांना पात्रता मिळाली.

तर, ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातून ‘एसईबीसी’मध्ये, आणि ‘एसईबीसी’ प्रवर्गातून ‘ओबीसी’मध्ये अर्ज करण्याची मागणी उमेदवारांकडून केली जात आहे. मात्र, आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीत प्रवर्ग बदलण्याची सुविधाच उपलब्ध नाही. त्यामुळे परीक्षा जवळ आली, तरीही उमेदवार अर्ज करू शकले नाहीत.

You may have missed