MSRTC Officer Transfer | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एक हजार अधिकाऱ्यांवर बदल्यांची टांगती तलवार

मुंबई : MSRTC Officer Transfer | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात वर्षानुवर्षे एकाच पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Transport Minister Pratap Sarnaik) यांनी सोमवारी एसटी महामंडळाला तीन वर्षांहून अधिक काळ एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करण्याचे आदेश दिले. यामुळे राज्यातील सुमारे एक हजार अधिकाऱ्यांना बदल्यांचा सामना करावा लागत आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली विविध कामगार संघटनांनी परिवहन मंत्री सरनाईक यांची भेट घेतली. या वेळी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमनवार उपस्थित होते.
अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहत असल्याने, त्यांचा काही कर्मचाऱ्यांमध्ये निहित स्वार्थ निर्माण होतो, ज्यामुळे आर्थिक अनियमितता होण्याची शक्यता वाढते. अनेकदा याचा उपयोग महामंडळाच्या कामांव्यतिरिक्त अन्य कामांसाठीदेखील होतो. त्यामुळे सामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो. याचा एकत्रित परिणाम एसटीसेवेवर होतो. एकाच मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा अधिक वेळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करावी, असे निवेदन आमदार पडळकर यांनी दिले. त्यानंतर अधिवेशन संपल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बदल्यांसंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिले.