Mulshi Kesari 2025 | मनीष रायते (इंदापूर) ठरला मुळशी केसरी 2025चा मानकरी ! मुळशीच्या आखाड्यात ऐतिहासिक जल्लोष
पुणे / मुळशी : Mulshi Kesari 2025 | मुळशी केसरी प्रतिष्ठानच्या वतीने सलग १८व्या वर्षी आयोजित करण्यात आलेली भव्य मुळशी केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ मुळशी तालुक्यातील घोटवडे फाटा येथील सुंदरबन लॉनजवळ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या स्पर्धेमुळे मुळशी तालुक्यातील कुस्ती प्रेमींमध्ये नवचैतन्य संचारले असून संपूर्ण परिसर कुस्तीमय वातावरणाने भारावून गेला होता.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील नामांकित तसेच उदयोन्मुख मल्लांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. मातीच्या आखाड्यात मल्लांनी सादर केलेली ताकद, चपळाई, तांत्रिक कौशल्य आणि डावपेच पाहण्यासाठी हजारो कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. प्राथमिक फेऱ्यांपासून अंतिम लढतींपर्यंत प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा ठरला.
मुळशी केसरी २०२५चा मानकरी मनीष रायते (इंदापूर) ठरला. अंतिम सामन्यात दमदार खेळ करत त्याने विजेतेपदावर आपले नाव कोरले. सागर देवकाते (इंदापूर) याने उपविजेतेपद पटकावले, तर अविनाश गावडे (इंदापूर) तृतीय आणि अभिजित भोईर (मुळशी) चतुर्थ क्रमांकावर राहिला.
तसेच अमृता केसरीचा मानकरी भारत मदने (बारामती) ठरला, तर मुन्ना झुंजुरके (मुळशी) याने उपविजेतेपद मिळवले. या थरारक लढतींनी आखाड्यातील वातावरण कमालीचे रंगले.
यावेळी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना “मुळशीरत्न पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला. यामध्ये सुमित–सुनीता कैलास दाभाडे, दर्शन दत्तात्रय काळभोर आणि पै. पृथ्वीराज राजेंद्र मोहोळ यांचा गौरव करण्यात आला. तसेच विद्यमान आमदार श्री. शंकरभाऊ मांडेकर यांचा मुळशी केसरीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
विजेत्या व उपविजेत्या मल्लांना आकर्षक रोख बक्षिसे, चषक, मानचिन्हे व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नवोदित मल्लांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
या भव्य कार्यक्रमास आमदार शंकर मांडेकर, सह. पोलीस आयुक्त मनोज पाटील, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, हिंद केसरी अमोल चडे, रिपब्लिकन पक्षाच्या युवा आघाडीचे राज्य संघटक उमेश कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी कुस्ती ही महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा असून ग्रामीण भागातील तरुण मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुळशी केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल, संस्थापक भास्कर मोहोळ, दत्ता काळभोर, सचिन मोहोळ तसेच सर्व संयोजन समिती, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आखाडा व्यवस्थापन आणि प्रेक्षकांसाठी उपलब्ध सुविधांमुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली.
वजनगटानुसार निकाल
५७ किलो: स्वप्निल शेलार (बारामती) प्रथम, अथर्व गोळे (पिरंगूट) द्वितीय, ओम गायकवाड (हवेली) तृतीय, श्रेयस तनपुरे (हवेली) चतुर्थ.
६१ किलो: शिवराज पायगुडे (आगळांबे) प्रथम, ओंकार ताठे (भोर) द्वितीय, अभिषेक लिम्हण (वेल्हा) तृतीय, व्यंकटेश देशमुख (भूगाव) चतुर्थ.
६५ किलो: अमोल वालगुडे (वेल्हा) प्रथम, युवराज सातकर (मावळ) द्वितीय, उदयसिंह मोरे (कात्रज) तृतीय, शिवम महाले (मुळशी) चतुर्थ.
७० किलो: योगेश्वर तापकीर (हवेली) प्रथम, अभिजित शेडगे (वेल्हा) द्वितीय, श्रीकृष्ण राऊत (राजगड) तृतीय, कौशल हुलावले (मुळशी) चतुर्थ.
७४ किलो: नामदेव कोकाटे (इंदापूर) प्रथम, शुभम जाधव (दौंड) द्वितीय, विपुल थोरात (इंदापूर) तृतीय, चैतन्य पिंगळे (मुळशी) चतुर्थ.
