Mumbai Crime News | धक्कादायक! आमदार निवासात रुग्णवाहिका न मिळाल्याने ज्येष्ठाचा मृत्यू

मुंबई : Mumbai Crime News | मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवास येथे रुग्णवाहिका नसल्याने ग्रामीण भागातील एका कार्यकर्त्याच्या वडिलाचा मृत्यू झाला आहे. चंद्रकांत धोत्रे (वय ६१) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा मुलगा विशाल धोत्रे हा आमदार विजय देशमुख यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत धोत्रे हे न्यायालयाच्या कामासाठी मुंबईत आले होते. त्यामुळे ते मतदारसंघातील असल्यामुळे आमदार विजय देशमुख यांच्या खोली क्रमांक ४०८ मध्ये थांबले होते. दरम्यान सोमवारी मध्यरात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांनी रुग्णवाहिकेला फोन केला, पण ती वेळेत उपलब्ध झाली नाही. परिणामी आमदार निवासजवळ असणाऱ्या पोलिसांच्या दोन नंबरच्या गाडीतून चंद्रकांत धोत्रे यांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.
दरम्यान, धोत्रे यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. सध्या धोत्रे यांचा मृतदेह घेऊन नातेवाईक गावी जाण्यासाठी रवाना झाले आहेत. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर आमदार निवास परिसरात वेळेत रुग्णवाहिका मिळू न शकल्याने अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहे.