Mumbai High Court To Pune Police | सुविधा दुकाने 24 तास सुरू राहू शकतात ! पुणे पोलिसांनी 11 वाजता दुकाने बंद करण्याची जबरदस्ती करू नये, उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई : Mumbai High Court To Pune Police | पुण्यातील हडपसर भागात ‘द न्यू शॉप’ चालविणाऱ्या ॲक्सेलरेट प्रॉडक्ट्स व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने सुविधा दुकाने रात्रभर सुरू राहू शकत नाही, असे कायद्यात कुठेही नमूद नाही. तरीही स्थानिक पोलिस बेकायदेशीर व मनमानीपणे कंपनीला रात्री ११ वाजता दुकान बंद करण्यास सांगतात, याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने महत्वाचे निरीक्षण नोंदविले आहे.
सुविधा दुकाने २४ तास सुरू राहू शकतात. कायद्याने त्यांना वेळेचे बंधन नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. चोवीस तास दुकाने सुरू राहिल्याने ग्राहकांची सोय होते. शिवाय रोजगाराची संधी निर्माण होईल आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असे म्हणत उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना रात्री ११ वाजता दुकाने बंद करण्याची जबरदस्ती करू नये, असे निर्देश मंगळवारी (दि.१) दिले.
सुविधा दुकाने रात्रंदिवस सुरू ठेवण्याची संकल्पना जगभरात लोकप्रिय आहे, असे न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने म्हटले. ज्यांच्या कामाचे तास ठरलेले असतात, अशा लोकांसाठी २४ तास सुविधा दुकाने उपयुक्त ठरतात. त्यामुळे ग्राहकांना खरेदी करणे सोपे जाते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने नेमकं काय म्हंटलं?
‘महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (सेवेचे नियमन आणि सेवाशर्ती) कायद्यांतर्गत सुविधा दुकानांना चोवीस तास आणि आठवड्याचे सातही दिवस सुरू ठेवण्यास कोणतीही ‘बंदी’ नाही. केवळ हुक्का बार, परमिट रूम, डान्स बार किंवा दारू देणाऱ्या आस्थापनांसाठीच निर्बंध आहेत,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तर वेळेच्या निर्बंधाबाबत गैरसमज निर्माण झाला होता. याचिकाकर्त्याला कायदेशीर कृती करण्यापासून रोखण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.