Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे प्रवास आणखी वेगवान होणार; एक्सप्रेस वे 10 पदरी करण्याचा निर्णय
मुंबई : Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी कमी करून प्रवास अधिक वेगवान आणि सुकर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेचे विस्तारीकरण करून हा मार्ग आता १० पदरी करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विस्तारीकरणाच्या कामाला पावसाळ्यानंतर सुरुवात केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार असून मुंबई-पुणे प्रवास अधिक जलद होण्याची अपेक्षा आहे.
या कामासाठी पुढील तीन वर्षांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून २०२९-३० पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. काम सुरू असताना वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी विस्तारीकरण टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.
दरम्यान, या १० पदरी विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असल्याने वित्तीय संस्थांकडून कर्जाच्या माध्यमातून निधी उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्याची परतफेड करण्यासाठी सध्याच्या टोल वसुलीच्या मुदतीत १५ वर्षांची वाढ करण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे २०४५ पर्यंत असलेली टोल वसुलीची मुदत २०६० पर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या निर्णयामुळे मुंबई-पुणे प्रवास अधिक सुसाट होण्याची चिन्हे असून, हजारो प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळू शकतो.
