Mundhwa Pune Crime News | घोरपडी कॅनॉल परिसरात दोघा दारु विक्रेत्यांकडील 110 लीटर हातभट्टी नष्ट; मुंढवा पोलिसांची कारवाई

पुणे : Mundhwa Pune Crime News | छुप्या पद्धतीने गावठी हातभट्टीची निर्मिती करून विक्री करणार्या दोघांविरूद्ध मुंढवा पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ११ हजार रुपये किंमतीची ११० लीटर हातभट्टी जप्त करण्यात आली. शिंदेवस्ती परिसरातील घोरपडी कॅनॉल परिसरात कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सुरेखा रतन गुमाने (रा. घोरपडी) आणि मधुकर मोतीराम सरोदे (रा. रामनगर, घोरपडी) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
मुंढवा तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, शिंदे वस्ती परिसरात घोरपडी कॅनॉलनजीक गावठी हातभट्टी विक्रीची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सुरेखा गुमाने हिला ताब्यात घेतले. तिच्याकडून ५ हजार रुपये किंमतीची ५० लीटर हातभट्टी ताब्यात घेऊन नष्ट केली. त्यानंतर पथकाने मधुकर सरोदे याचा शोध घेतला. तो बी़ टी़ कवडे येथील जुन्या पुलाखाली जुना कॅनॉल लगत हातभट्टी दारू विक्री करताना मिळून आला. त्याच्याकडून ६ हजार रुपयांची ६० लीटर हातभट्टी जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली. (Mundhwa Pune Crime News)