Myanmar-Thailand Earthquake News | म्यानमार, थायलंडमध्ये भूकंप; 700 जणांचा मृत्यू, 1600 हून अधिक जखमी

नवी दिल्ली : Myanmar-Thailand Earthquake News | म्यानमार आणि शेजारच्या थायलंड या दोन देशांत शुक्रवारी (28 मार्च) मोठा भूकंप झाला. या भयंकर भूकंपामध्ये सुमारे ७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, जखमींची संख्या 1670 च्या पुढे असल्याची माहिती आहे. या भूकंपामुळे 30 लाख नागरिक विस्थापित झाल्याची माहिती तेथील प्रशासनाने दिली.
भूकंपाचे सलग सात धक्के बसले आहेत. त्यापैकी 7.7 (रिष्टर स्केल) तीव्रतेचा सर्वात मोठा धक्का होता. भूकंपानंतर म्यानमार आणि थायलंडमध्ये अनेक इमारती कोसळल्या. घरे उद्ध्वस्त झाली. शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असून, ठिकठिकाणी बचाव मोहि सुरू आहे. दुभंगलेले रस्ते, उघडलेले महामार्ग, कोसळलेले पूल असे चित्र भूकंपग्रस्त परिसरात दिसत आहे. म्यानमारमधील लष्कराने भूकंपानंतर 6 प्रांतांत आणीबाणीची घोषणा केली.
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या (US Geological Survey) माहितीनुसार, हा भूकंप 10 किलोमीटर खोलीवर होता. भूकंपानंतर 6.4 तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. दरम्यान, म्यानमारला लागून असलेल्या चीनच्या नैऋत्य युनान प्रांतातही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. मात्र, तिथे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, भूकंपाची तीव्रता इतकी होती की, म्यानमारच्या शेजारील राष्ट्रांमध्ये (सीमा भागात) धक्के जाणवले. बांगलादेश, लाओस, चीन आणि भारतातही हे धक्के जाणवले. भारतात मणिपूर आणि पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने भारतात या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) म्हणाले, ”अडचणीच्या प्रसंगी भारत या दोन्ही देशांच्या बरोबर उभा आहे. दोन्ही देशांना लागेल, ती मदत करण्यास भारत तयार आहे.” पाठोपाठ भारताने म्यानमार व थायलंडला मदत पाठवली आहे.