Nagpur Crime News | पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाची कुणकुण, जीवे मारेल या भीतीतून हत्येचा कट रचला, गळ्यावर कोयत्याने सपासप वार, ३३ वर्षीय तरुणाची हत्या

नागपूर: Nagpur Crime News | अनैतिक संबंधातून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेरा सूर्यप्रकाश मलिक (वय -३३) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर गितेश उर्फ रजत उके आणि भोजराज मोरेश्वर कुंभारे असे हत्या करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बांगलादेश वस्तीत नाईक तलाव परिसरात ही घटना घडली. (Murder Case)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गितेश उके याचे शेरा मलिक याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याबाबतची माहिती जेव्हा शेरा याला समजली त्यावेळी शेराने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गितेशने त्याचे म्हणणे ऐकून घेतले नाही. पण त्याला शेरा आपल्याला जीवे मारेल याची भीती होती. या भीतीनेच गितेशने शेराच्या हत्येचा कट रचला. यासाठी त्याने भोजराज कुंभारेची मदत घेतली.
भोजराज याला शेराची माहिती काढण्यास सांगितले. भोजराजने शेरा घरी असल्याची माहिती दिली. त्यानंतर दोन्ही आरोपी शेराच्या घरी गेले. त्यानंतर गितेशने शेरा याला बाहेर बोलावले. तो बाहेर येताच दोघांनी त्याच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार केले. यात गंभीर जखमी झालेला शेराचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाच तासांतच दोन्ही आरोपींना अटक केली. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.