Nagpur Violence News | हिंसाचारातील आरोपी देशाचे नागरिक नाहीत का? नागपूर बुलडोझर कारवाईवर न्यायालयाने राज्य सरकार व महापालिकेला फटकारले

court danduka

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Nagpur Violance News | नागपूर येथील हिंसाचाराचा कथित मास्टर माईंड फहीम खान आणि आरोपी अब्दुल हफीज शेख लाल यांच्या घरांवरील बुलडोझर कारवाई प्रथमदृष्ट्या अवैध आढळून आल्यामुळे नागपूर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कारवाईवर न्यायालयाने महापालिकेला चांगलेच फटकारले आहे.

हिंसाचारातील आरोपी देशाचे नागरिक नाहीत का? त्यांची घरे पाडताना कायद्याचे पालन करण्याची गरज नाही का? असा परखड प्रश्न न्यायालयाने राज्य सरकार आणि नागपूर महापालिकेला केला आहे. तसेच, बुलडोझर कारवाईला अंतरिम स्थगिती देत महापालिका आयुक्तांना नोटीस बजावून कारवाईवरील आक्षेपांवर 15 एप्रिल पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

बुलडोझर कारवाईविरुद्ध फहीम खानची आई जेहरुनिस्सा शमीम खान आणि अब्दुल हफीजचा मुलगा मो. अयाज अब्दुल हफीज शेख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयाने याबाबत निरीक्षण नोंदविले आहे.

नागपूरच्या चिखलीमधील संजय बाग कॉलनीत फहीम खानचे घर न्यायालयाच्या स्थगितीपूर्वीच पाडण्याची कारवाई महापालिकेने पूर्ण केली. तर महालमधील अब्दुल हफीजच्या घराचा काही भाग पाडण्यात आला. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई थांबविण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 13 नोव्हेंबर 2024 च्या निर्णयाची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे नमूद करून मुख्य सचिवांना पुढच्या सुनावणीपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.