Nanded Tractor Accident | शेतमजुरांना घेऊन जाणारा टॅक्टर विहिरीत कोसळला, ९ जणांचा मृत्यू ; १५ वर्षाचा मुलगा टॅक्टर चालवत असल्याची धक्कादायक माहिती

नांदेड : Nanded Tractor Accident | जवळपास १२ महिला व पुरुष शेतमजुरांना घेऊन जाणारा टॅक्टर विहिरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज शुक्रवार (दि.४) सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. विहिरीत पडलेल्या पैकी दोन महिला आणि एका पुरुषाला बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. परंतु मागील तीन तासापासून मदतीसाठी कोणतीही यंत्रणा पोहोचली नसल्याने विहिरीत पडलेल्यांपैकी ९ जण मृत झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अधिक माहितीनुसार, नांदेड तालुक्यातील आलेगाव आणि रुंज येथील महिला, पुरुष मजुरांना घेऊन भुईमूग काढण्यासाठी निघालेला ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. विहिरीमध्ये पाणी आणि गाळ असल्यामुळे ट्रॅक्टर पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे. मागील तीन तासांपासून विहिरीत पडलेल्या महिला पुरुषांना बाहेर काढण्याचे प्रयत्न परिसरातील ग्रामस्थांकडून सुरू आहेत. सदर ट्रॅक्टर हा एक १५ वर्षाचा मुलगा चालवत होता, अशी धक्कादायक माहिती पुढे येत आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.