Nandurbar Accident News | घरात सुरू होती लग्नाची तयारी अन् नियतीने केला घात; भरधाव डंपरच्या धडकेत 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Nandurbar Accident

नंदुरबार : Nandurbar Accident News | घरात लग्नाची तयारी सुरू होती. अशातच रमजान ईद असल्याने मित्रांसोबत दर्ग्याच्या दर्शनासाठी निघालेल्या 22 वर्षीय युवकाचा अपघातात मृत्यू झाला. फोन करण्यासाठी एके ठिकाणी थांबले असताना वाळू भरलेल्या भरधाव डंपरने धडक दिली. यात युवकाच्या जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी नंदुरबार जिल्ह्यातील नळगव्हाण फाट्याजवळ घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

घरी ईद साजरी केल्यानंतर तळोदा येथील सर्फराज अशपाक शेख (वय 22) हा जाकीर मन्सूरी (वय 22) आणि शामीन याकूब खाटिक (वय 24) या दोघा मित्रांसोबत दर्ग्याच्या दर्शनासाठी दुचाकीने (एम.एच 39 क्यू 0833) दुपारी 2 वाजेच्या सुमारास अक्कलकुवा येथे जात होता. त्यावेळी फोनवर बोलण्यासाठी तळोदा ते अक्कलकुवा दरम्यान असलेल्या नळगव्हाण फाट्याजवळ थांबले होते. त्याचवेळी मागून भरधाव येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेले दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना तात्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. डॉ. संतोष ठाकरे यांनी त्यांच्यावर उपचार केले. उपचारादरम्यान सर्फराज यास मृत घोषित करण्यात आले. तळोदा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. मुस्लिम बांधवांनी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

दरम्यान, तळोदा येथील सर्फराज शेख याचा नुकताच साखरपुडा झाला होता. त्यामुळे त्याच्या घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. मात्र नियतीने घात केला. घरातील लोक लग्नाच्या तयारीत मग्न असताना अचानक त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

You may have missed