Nashik Accident News | मालेगाव–मनमाड रोडवर पहाटेचा कहर : ट्रॅव्हल्स-पिकअप भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी
नाशिक : Nashik Accident News | पहाटेच्या शांततेला हादरवून टाकणारी भीषण दुर्घटना मालेगाव–मनमाड महामार्गावर सोमवारी घडली. मालेगाव तालुक्यातील वऱ्हाणे गावाजवळ पहाटे सुमारे तीन वाजता झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे जण गंभीर जखमी आहेत. या अपघातात 20 पेक्षा अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्याकडून मालेगावच्या दिशेने येणारी एक खासगी ट्रॅव्हल्स आणि समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, पिकअप वाहन थेट ट्रॅव्हल्समध्ये घुसले आणि बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता.
या अपघातामध्ये चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. याशिवाय ट्रॅव्हल्समधील 20 हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य राबवण्यात आले. जखमींना मालेगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
