Nashik Crime News | ‘माझं पत्नीवर खूप प्रेम आहे, तिला मी मुक्त करत आहे….’ सेवानिवृत्त प्राध्यापकाकडून पत्नीची हत्या, नंतर स्वतःही गळफास घेत केली आत्महत्या

नाशिक : Nashik Crime News | ‘मला तिचे हाल बघवत नाही, माझं पत्नीवर खूप प्रेम आहे, तिला मी मुक्त करत आहे….’ असे म्हणत एका सेवानिवृत्त प्राध्यापकाने त्याच्या ७६ वर्षांच्या पत्नीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वतः साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या जेलरोड भागात बुधवारी रात्री उघडकीस आली. लता मुरलीधर जोशी (वय-७६) आणि मुरलीधर रामचंद्र जोशी (वय-८०)) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
अधिक माहितीनुसार, नाशिकच्या जेलरोड येथे मागील अनेक वर्षांपासून जोशी दाम्पत्य वास्तव्यात होते. त्यांची दोन मुले हे त्यांच्या कुटुंबासह मुंबई शहरात राहतात. अधून मधून दोघेही मुले आपल्या कुटुंबाला घेऊन नाशिकला आई-वडिलांसोबत राहण्यासाठी यायचे किंवा आई बाबाला आपल्या मुंबईच्या घरी घेऊन जायचे.
लता जोशी या आजारपणामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून अंथरुणाला खिळून होत्या. त्यामुळे त्यांच्या देखरेखीसाठी एक महिला मोलकरीण ठेवली होती. ती महिला जोशी दाम्पत्यांसोबत त्यांचेच घरात राहत होती. काल सायंकाळी मोलकरीण घरातून कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर मुरलीधर जोशी यांनी आजारी पत्नीची हत्या करून स्वतः देखील टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी जोशी यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये त्यांनी ‘मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो, तिची आजारपणातून सुटका करत आहे…’ असे लिहून पत्नीचा गळा आवळला. त्यानंतर मुरलीधर जोशी यांनी स्वतःही गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.