Nashik Crime News | वर्षभरापूर्वी नात्यातीलच मुलीशी लग्न, वाद झाल्याने पत्नी माहेरी, परत आणण्यास गेला असता सासूचा विरोध, पतीने स्वतःला पेटवून घेत पत्नी आणि सासूला मारली मिठी

नाशिक : Nashik Crime News | कौटुंबिक वादातून माहेरी गेलेली पत्नी सासरी यायला तयार नसल्याने संतापलेल्या पतीने स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेत पत्नी आणि सासूला मिठ्या मारत स्वतःसोबत त्यांनादेखील संपवून टाकण्याचा प्रयत्न केला. सोनारी (ता. सिन्नर) येथे सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, या घटनेत तीन जण गंभीर भाजले असून, पेटवून घेणाऱ्या पतीचा जिल्हा रुग्णालयात सोमवारी (दि.७) दुपारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. केदारनाथ दशरथ हांडोरे (रा. शिंदेवाडी, पंचाळे) असे पतीचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, केदारनाथ याचा वर्षभरापूर्वी नात्यातीलच असलेल्या स्नेहल सोमनाथ शिंदे हिच्याशी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर त्यांच्यात भांडणे होत असल्याने महिनाभरापूर्वी स्नेहल माहेरी सोनारी येथे आई-वडिलांकडे निघून आली होती. तिला परत आणण्यासाठी रविवारी (दि. ६) रात्री केदारनाथ आपल्या काही मित्रांना घेऊन सासुरवाडीला गेला होता.
पत्नी सोबत यायला तयार नव्हती. सासूचा तिला सोबत पाठवायला विरोध होता, त्यामुळे संतप्त झालेल्या केदारनाथने घरातच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतले. स्वतः संपायचेच पण पत्नी आणि सासूला देखील जीवे मारायचे या प्रयत्नातून त्याने दोघींनाही मिठ्या मारून पकडून ठेवले. दोघींचा आरडाओरडा ऐकल्यावर आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली.
तिघांच्याही अंगावरील कपड्यांनी पेट घेऊन ते काही प्रमाणात भाजले होते. त्यांना त्या अवस्थेत उपचारासाठी नाशिकला नेण्यात आले. केदारनाथची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात, तर पत्नी स्नेहल व सासू अनिता यांना नाशिक रोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सोमवारी (दि. ७) दुपारी केदारनाथचा मृत्यू झाला.
स्नेहलने सिन्नर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून केदारनाथ व त्याच्यासोबत आलेल्या चौघा मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘केदारनाथ व त्याचे मित्र हरीश डुंबरे, कृष्णा थोरात, गणेश थोरात, विशाल तुपसुंदर यांनी मला व आईला चाकूचा धाक दाखवून धमकावले, धक्काबुक्की केली’ असे स्नेहलने फिर्यादीत म्हटले आहे.