Navin Marathi School Pune | नवीन मराठी शाळेचा पुन्हा एकदा विश्वविक्रम

पुणे : Navin Marathi School Pune | दि. २७/०३/२०२५ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेने कराटे मधील तीन मिनिटात सर्वाधिक पंचेस करण्याचा विश्वविक्रम करत इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. शाळेतील एकूण १२९६ विद्यार्थ्यांनी यात सहभागी होत एका मिनिटात ७५ पंच प्रत्येक विद्यार्थ्याने मारलेले आहेत.तसेच तीन मिनिटात प्रत्येक विद्यार्थ्याचे २२४ पंच झालेले आहेत.एकूण सर्व विद्यार्थ्यांचे मिळून २,९०,३०४ पंच नोंदवून विश्वविक्रम केला आहे. आयडियल तायक्वांदो कराटे, किक बॉक्सिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने नवीन मराठी शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयडियल तायक्वांदो, कराटे किक बॉक्सिंगचे अध्यक्ष संजय सोनवणे, इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे परीक्षक शाकीर शेख डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी राजेंद्र जोग ॲडवोकेट राजश्री ठकार,नवीन मराठी शाळेचे तायक्वांदो व कराटे प्रशिक्षक दिनेश भुजबळ, असोसिएशनचे प्रत्येक जिल्ह्याचे प्रमुख इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक,शैक्षणिक, बौद्धिक विकास होऊन संरक्षणाबद्दल जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करून प्रत्यक्ष पंच मारण्याचा एक एक मिनिटाचा सराव घेण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष विश्वविक्रमासाठीचे पंच मारणे सुरू झाले.१२९६ विद्यार्थ्यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत न थकता अचूक आपले लक्ष्य पूर्ण केले.
उपस्थित सन्माननीय पाहुणे व पालक वृंदांकडून नवीन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचे या विश्वविक्रमाबद्दल अभिनंदन करण्यात आले. भाग्यश्री हजारे यांनी सूत्रसंचलन केले.अर्चना देव यांनी अतिथी परिचय करून दिला.योगिता भावकर यांनी आभार मानले. ज्येष्ठ शिक्षक तनुजा तिकोने, धनंजय तळपे व सर्व शिक्षकांनी नियोजनास सहाय्य केले.