Neelam Gorhe | मोठी बातमी! सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण: थेट पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याचे नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
मुंबई : Neelam Gorhe | सातारा जिल्हा परिषदेच्या आवारात लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात झालेल्या अभूतपूर्व राड्याचे पडसाद आता थेट विधीमंडळात उमटले आहेत. या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांना (SP) तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नुकतेच सातारा जिल्हा परिषदेच्या आवारात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. या वादाचे रूपांतर नंतर धक्काबुक्की आणि गोंधळात झाले. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी परिस्थिती हाताळण्यात हलगर्जीपणा केल्याचा आणि लोकप्रतिनिधींना संरक्षण देण्यास अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा फज्जा उडाल्याचे दिसून आले होते.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणावर भाष्य करताना म्हटले की, “जिल्हा परिषदेसारख्या ठिकाणी अशा प्रकारचा राडा होणे आणि पोलिसांनी तिथे बघ्याची भूमिका घेणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. लोकप्रतिनिधींच्या हक्कांचे संरक्षण करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे.” याप्रकरणी त्यांनी केवळ चौकशीचे आदेश न देता थेट पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश गृह विभागाला दिले आहेत.
शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस अधीक्षक आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलीस अधीक्षक हे घरगड्यासारखं वागले असल्याचा आरोप त्यांनी केला. साताऱ्यातील या घटनेची दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले.
