Neelam Gorhe | हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विधान भवनात अभिवादन
“मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा आवाज म्हणजे बाळासाहेब ठाकरे” – डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : Neelam Gorhe | हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान भवन येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “आज २३ जानेवारी रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शंभरावा जन्मदिवस आहे. या निमित्ताने विधानमंडळाच्या पवित्र परिसरात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याचा आम्हाला मान मिळाला.”
डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी विधान भवनाच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य पोर्ट्रेटच्या उद्घाटनाचा संदर्भ देत सांगितले की, समाजातील लाखो लोकांना नेतृत्वाची दिशा देणाऱ्या आणि हजारो लोकांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा देणाऱ्या अशा थोर व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्राच्या जनतेच्या हक्काच्या ठिकाणी ‘विधान भवनात’, आदरांजली वाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
“विधान भवनात अत्यंत निवडक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचीच छायाचित्रे लावली जातात. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश होणे, हे त्यांच्या असामान्य कार्याचेच प्रतीक आहे,” असे त्यांनी नमूद केले.
मराठी अस्मिता, सुशासन, दळणवळण, पाणी प्रश्न, रोजगाराच्या संधी यांसारख्या विविध विषयांवर बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेले विचार आजही मार्गदर्शक ठरत असल्याचे सांगत, “देशाची अस्मिता ही व्यक्तीच्या अस्मितेपेक्षा मोठी आहे. मराठी भाषेचा सन्मान जपतानाच प्रत्येकाला रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत, या भूमिकेतून आम्ही विधिमंडळात काम करत आहोत,” असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
२०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवतीर्थावर लाखोंच्या संख्येने जनसागर उसळला होता. त्या वेळी सर्वसामान्य नागरिकांपासून ते देशभरातील कोट्यवधी लोकांनी अश्रूंनी डोळे भरून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. त्याच भावनांचे प्रतिबिंब विधिमंडळातील श्रद्धांजलीपर भाषणांमधूनही दिसून आले होते, अशी आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
“मी शिवसेनेची विधान परिषद सदस्य असले तरी विधान परिषद उपसभापती या नात्याने अत्यंत नम्रतेने आणि आदरयुक्त भावनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करते,” असे भावनिक उद्गार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काढले.
