Neelam Gorhe | “बदलापुरात शिवसेना नगरसेवकावर हल्ला प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची गरज” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
बदलापूर : Neelam Gorhe | बदलापूर शहरात राजकीय वर्चस्वाच्या वादातून शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला असून, शिवसेनेचे नगरसेवक हेमंत चतुरे यांच्यावर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, हल्ल्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेनंतर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जखमी हेमंत चतुरे यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या घटनेत हेमंत चतुरे अत्यंत गंभीर जखमी झाले असून, ही मारहाण पूर्णपणे एकतर्फी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. दुसऱ्या बाजूचा कोणीही जखमी झालेला नाही. आदिवासी समाजाशी संबंधित व्यक्ती असल्याने हा प्रकार अधिक संवेदनशील असून, या प्रकरणाची जिल्हास्तरावर तसेच पोलीस महासंचालक पातळीवर सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, शांतता आणि न्याय सर्वांना मिळावा हीच आमची भूमिका आहे. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. या हल्ल्यामुळे जखमींच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या योग्य उपचाराबद्दल त्यांनी आभार मानले.
पुढे त्या म्हणाल्या की, जखमींचे जबाब नोंदवले गेल्यानंतर आरोपींपर्यंत पोहोचणे सोपे होईल. तसेच या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून, खरा न्याय मिळावा यासाठी लवकरात लवकर या प्रकरणाचा मार्ग निघावा अशी आमची अपेक्षा आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे या परिसराकडे लक्ष असतानाही अशा घटना घडत असतील तर त्या चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले. “मतभेद असावेत, पण मनभेद नसावेत,” असे सांगत डॉ. गोऱ्हे यांनी, मतभेदातून मार्ग काढत विकासाच्या दृष्टीने एकत्र काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. शरीराला इजा होईल इतपत राजकीय वाद वाढणे हे दुर्दैवी असून, समाजात सलोखा आणि शांतता टिकवणे हेच सर्वांचे कर्तव्य आहे, असे त्यांनी शेवटी सांगितले.
