New India Coop Bank Scam | 122 कोटींच्या सहकारी बँक घोटाळ्यात धक्कादायक माहिती समोर; प्रीती झिंटाला 1.55 कोटींचे कर्ज माफ

मुंबई : New India Coop Bank Scam | गैरव्यवहारामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेने अभिनेत्री प्रीती झिंटाला (Actress Preity Zinta) कर्ज परतफेड करण्यासाठी विशेष सवलत दिली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील या सहकारी बँकेत सुमारे 122 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा पोलिस तपास करत असताना ही बाब उघडकीस आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, घोटाळ्यात अडकलेल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेकडून अभिनेत्री प्रीती झिंटाने 18 कोटींचे कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडण्यासाठी बँकेने प्रीती झिंटाला 1.55 कोटींची कर्जमाफी दिली होती. बँकेने या रक्कमेला बँकेने नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (एनपीए) म्हणून वर्गीकृत केले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रीती झिंटाला 2011 मध्ये कर्ज मंजूर झाले होते. त्यानंतर तिने हे कर्ज एप्रिल 2014 मध्ये फेडले. मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याची चौकशी करत आहे. याप्रकरणी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. यात बँकेचे माजी महाव्यवस्थापक आणि लेखा प्रमुख हितेश मेहता यांचाही समावेश आहे. हितेश मेहता यांना 15 फेब्रुवारीला अटक केली होती.
दरम्यान, तपास अधिकाऱ्यांनी 2010 पासून बँकेच्या कर्जाच्या डेटाची तपासणी केली. 7 जानेवारी 2011 रोजी प्रीतीला 18 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. या कर्जासाठी प्रीतीने तिच्या काही मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवली होती. यात मुंबईतील एक फ्लॅट आणि शिमलामधील मालमत्तेचा समावेश होता. या मालमत्तेची किंमत 27.41 कोटी इतकी होती. नोव्हेंबर 2011 मध्ये तिने बँकेला 11.40 कोटींची परतफेड केली.