New Police Stations In Pune | पुणे शहर पोलीस दलात आणखी नव्या 5 पोलीस ठाण्यांची निर्मिती; सायबर पोलीस ठाण्यासह एकूण 45 पोलीस ठाणी, नवीन 830 पदांनाही मंजुरी
पुणे : New Police Stations In Pune | वर्षभरात एक हजारांहून अधिक गुन्हे दाखल होत असलेल्या पोलीस ठाण्यामधून नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात पुणे शहर पोलीस दलात ५ नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच या सर्व नवीन पोलीस ठाण्यात प्रत्येकी १६४ अशी ८३० नवीन पदे निर्मितीला मंजुरी देण्यात आली आहे. या संबंधीचे आदेश शासनाने रविवारी काढले आहेत. त्यामुळे पुणे शहरात आता सायबर पोलीस ठाण्यासह एकूण ४५पोलीस ठाणी झाली आहेत.
गेल्या वर्षी ३१ डिसेंबर २०२४ अखेर हडपसर पोलीस ठाणे – १९७४ गुन्हे दाखल झाले होते. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात १०३८ गुन्हे, कोंढवा १४२५ गुन्हे, भारती विद्यापीठ १०९८ गुन्हे, येरवडा पोलीस ठाणे ८६७ गुन्हे, सिंहगड रोड ७८५ गुन्हे, विमानतळ पोलीस ठाणे ६८७ गुन्हे दाखल झाले होते. वाढते नागरिकीकरण, पोलीस ठाण्याचे मोठे कार्यक्षेत्र हे लक्षात घेऊन नवीन ५ पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
सिंहगड रोड पोलीस ठाण्यातून नर्हे पोलीस ठाणे
येरवडा पोलीस ठाण्यातून लक्ष्मीनगर पोलीस ठाणे
हडपसर पोलीस ठाण्यातून मांजरी पोलीस ठाणे
विमानतळ पोलीस ठाण्यातून लोहगाव पोलीस ठाणे
कोंढवा व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातून येवलेवाडी पोलीस ठाणे अशा या पाच पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.
पुणे शहर पोलीस दलाने या नवीन पोलीस ठाण्यांसाठी लागणारी आवश्यक जागा व अन्य पायाभूत सुविधाबाबत अगोदरच प्राथमिक तयारी केली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष मंजुरी मिळाल्यानंतर ही पोलीस ठाणी लवकरच कार्यांन्वित होऊ शकतील.
मागील विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पालकमंत्री अजित पवार यांनी ५ नवीन पोलीस ठाण्याची घोषणा केली होती. त्यानंतर तातडीने ही पोलीस ठाणी सुरु झाली होती.
या ५ पोलीस ठाण्यांकरीता विविध संवर्गातील ८३० पदे निर्माण करण्यास व त्याकरीता येणार्या ६७ कोटी ४१ लाख ६७ हजार २८० रुपये आवर्ती आणि १ कोटी ८४ लाख ४० हजार रुपयांच्या अनावर्ती खर्चासही मान्यता देण्यात आली आहे.
या पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस निरीक्षक ४, सहायक पोलीस निरीक्षक ६, पोलीस उपनिरीक्षक १३, सहायक पोलीस उपनिरीक्षक १३, पोलीस हवालदार ४४, पोलीस अंमलदार ८४ अशी एकूण १६४ पदांची निर्मिती करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी नव्याने पोलीस ठाणी निर्मिती करण्यात आली. तेथे २ पोलीस निरीक्षक व एकूण १२५ पोलीस मनुष्यबळ सध्या कार्यरत आहेत. पुणे शहरातील काही पोलीस ठाण्यात ३ पोलीस निरीक्षकांची पदे आहेत. भविष्याचा विचार करुन या नवीन पोलीस ठाण्यात ४ पोलीस निरीक्षकांसह अधिक मनुष्यबळाची अगोदरच तरतुद करुन ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे.
