One State One Uniform Scheme | राज्य सरकारची ‘एक राज्य, एक गणवेश’ योजना बंद; काय आहे कारण? जाणून घ्या

मुंबई : One State One Uniform Scheme | महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) ‘एक राज्य, एक गणवेश’ योजना बंद केली आहे. त्यामुळे गणवेशाचा रंग आणि रचना निश्चित करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. याबाबत अध्यादेश जारी करण्यात आला आहे.
राज्य सरकारने ‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेनुसार विद्यार्थ्यांना एकसमान दोन गणवेश देण्याचे ठरविले होते. यात विद्यार्थ्यांना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ किंवा फुल पँट, तर विद्यार्थिनींच्या गणवेशाची रचना आकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो-फ्रॉक, आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट अशी होती. ज्या शाळांमध्ये विद्यार्थिनींना सलवार-कमीज असा गणवेश असेल, तिथे निळ्या रंगाची सलवार व आकाशी रंगाची कमीज असे ठरविण्यात आले होते.
दरम्यान, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होऊन देखील अनेक विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नव्हता. त्यामुळे ऐनवेळी सरकारला हे काम शाळा व्यवस्थापन समितीकडे द्यावे लागले होते. आता, चार महिन्यांनंतर, राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की शाळांनी रंग आणि डिझाइनचा निर्णय घ्यावा.
समग्र शिक्षांतर्गत केंद्र सरकारने निश्चित केलेली गणवेशाची रक्कम आणि राज्य सरकारच्या मोफत गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई या कार्यालयाकडून देण्यात येणार आहे. दरम्यान, शाळा स्तरावर वाटप करण्यात आलेल्या गणवेशाची शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनी अचानक तपासणी करावी. यामध्ये गणवेशाचे कापड निकृष्ट दर्जाचे आढळून आल्यास संबंधित शाळा व्यवस्थापन समितीला जबाबदार धरण्यात येईल, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.