Pakistan Airstrike In Afghanistan | पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर मोठा हवाई हल्ला; 400 जणांचा मृत्यू, तर 250 हून अधिक जखमी
नवी दिल्ली : Pakistan Airstrike In Afghanistan | पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावादाने आता भीषण वळण घेतले आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणिस्तानच्या हद्दीत शिरून केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात सुमारे ४०० लोकांचा मृत्यू झाला असून, २५० हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला असून, दक्षिण आशियात युद्धाचे ढग गडद झाले आहेत. पाकिस्तानकडून रहिवाशी परिसर आणि रुग्णालयांना लक्ष्य करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, काबूलमधील दहशतवादांच्या स्थळावर हल्ला केला असून, रुग्णालयांवर हल्ला केला नसल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. मात्र, या हल्ल्याचा मोठा फटका नागरी वस्त्यांना बसला आहे. मृतांमध्ये मोठ्या संख्येने महिला आणि बालकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना तातडीने काबूलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतात दहशतवादी हल्ले वाढले होते. या हल्ल्यांसाठी अफगाणिस्तानातील ‘टीटीपी’ (तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान) जबाबदार असल्याचा दावा पाकिस्तानने वारंवार केला होता. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा आरोप करत, पाकिस्तानने हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्याचे समजते.
अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, याला ‘नग्न आक्रमकता’ असे संबोधले आहे. “पाकिस्तानने आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले असून, या हल्ल्याचा बदला घेतला जाईल,” असा इशारा तालिबानच्या प्रवक्त्याने दिला आहे. या घटनेनंतर अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर (ड्युरंड लाईन) दोन्ही देशांनी आपले सैन्य तैनात केले असून मोठी युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
