Palkhi Mukkam Issue | पुण्यातील मुक्कामाबाबत 13 एप्रिलला निर्णय; आळंदी देवस्थानचे पालखी सोहळाप्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांची माहिती
Palkhi Mukkam Issue | आळंदी देवस्थानने यंदाच्या पालखी सोहळ्यात पुण्यातील मुक्कामाच्या ठिकाणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. मुक्कामासाठी जागेची कमतरता, दर्शनासाठी होणारी गैरसोय, वाहनतळाची अपुरी व्यवस्था, स्वच्छतागृहांचा अभाव, पिण्याच्या पाण्याची टंचाई, अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडी या अडचणींचा विचार करून भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातील मुक्काम अन्यत्र हलविण्याचा पर्याय गंभीरपणे विचाराधीन आहे.
पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज संघटना आणि आळंदी देवस्थान यांच्यात याबाबत सविस्तर चर्चा झाली. पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पर्यायी जागा निवडण्याबाबतचा अंतिम निर्णय १३ एप्रिलला जाहीर केला जाईल, अशी माहिती पालखी सोहळाप्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी दिली.
दरवर्षी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्काम असतो. मात्र, वाढती भाविकांची संख्या आणि उपलब्ध सुविधांची कमतरता यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. भाविकांना पावसात रांगेत उभे राहावे लागते, पार्किंगची सोय नसल्याने वाहतूक कोंडी होते, तसेच स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याचीही गैरसोय होत असल्याची बाब समोर आली आहे.
यासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये, सणस मैदान, स. प. महाविद्यालय, रेस कोर्स मैदान आणि नेहरू स्टेडियम यांसारख्या पर्यायी जागांचा विचार सुरू आहे. आळंदी देवस्थानने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय कोणालाही दुखावण्यासाठी नसून, वारकरी आणि समाजहित लक्षात घेऊन सर्वोत्तम पर्याय निवडला जाईल.
