Parth Pawar | पार्थ पवारांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर, शरद पवारांच्या प्रयत्नांना अडथळा?
मुंबई : Parth Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी ही घोषणा केली. पटेल यांनी स्वतः राज्यसभेचे उमेदवार म्हणून पार्थ पवार यांचे नाव जाहीर केले. गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा होती.
राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी ५ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागतील. महायुतीची ताकद लक्षात घेता, सत्ताधारी पक्ष ७ पैकी ६ जागा जिंकू शकतो. यापैकी ४ जागांसाठी भाजप उमेदवार उभे करेल. तर शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी १ जागा मिळेल. भाजप आणि शिंदे सेनेने अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. परंतु राष्ट्रवादीने पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
दरम्यान, पार्थ पवार यांचे आजोबा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील राज्यसभेवर जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण त्यांच्या पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नाही. त्यांच्याकडे केवळ दहा आमदारांचे बळ आहे. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी ३७ मतांची गरज आहे. त्यामुळे त्यांना शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. या दोन्ही पक्षांकडे मिळून ३६ मते आहेत.
