Patthe Bapurao Award | शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार वितरण समारंभ ! लोककलेची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत करणार – पांडुरंग घोटकर
पुणे : Patthe Bapurao Award | आयुष्यभर या लोककलेची सेवा केली आहे. माझा अखेरही माझ्या रसिकांपुढे ही लोककला सादर करीत असताना व्हावा. ढोलकी वादनाच्या माध्यमातून रसिकांची सेवा आयुष्यभर करत आलो व शेवटच्या श्वासापर्यंत करीत राहणार. अशा शब्दात ज्येष्ठ ढोलकी वादक पांडुरंग घोटकर गुरुजी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावर्षीचा पठ्ठे बापूराव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ‘शाहीर पठ्ठे बापूराव’ पुरस्कार प्रसिद्ध ढोलकी वादक पांडुरंग घोटकर यांना देण्यात आला. यावेळी त्यांनी पुरस्काराला उत्तर देताना घोटकर यांनी ढोलकीचा तोडा सादर केला व वाद्य व शब्द रूपातून रसिकांना मानवंदना दिली.
महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. पांडुरंग घोटकर यांना शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार स्वरूप २१ हजार रुपये स्मृतीचिन्ह, त्याबरोबरच लावणी नृत्यांगना प्रमिला लोदगेकर यांना ‘नामचंद पवळा’ पुरस्कार व शाहीर आप्पासाहेब उगले यांना ‘तमाशा साहित्यिक बापूसाहेब जिंतीकर’ पुरस्कार स्वरूप प्रत्येकी १५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह देऊन ज्येष्ठ विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर प्रशांत जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, नगरसेविका उज्वला जंगले , नगरसेवक नितीन गावडे, शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या सुनबाई नलिनी कुलकर्णी, बापूसाहेब जिंतीकर यांच्या सुनबाई छाया जिंतीकर, नातू किरण जिंतीकर, जय अंबिका कला केंद्र प्रमुख सुरेखा पवार, सुरेश घुले, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश वाघमारे, महोत्सव समिती अध्यक्ष मित्रावरून झांबरे, उपाध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, बापू जगताप, रवींद्र चव्हाण, कृष्णा ढेरंगे, रेश्मा परितेकर, संदीप घुले, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक झांबरे यांनी, आभार डॉ. जगदाळे यांनी. सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव दीपक वाघमारे यांनी केले.
यावेळी उल्हास पवार यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त ‘लोककलावंतांचे आश्रयदाते व रसिकाग्रणी उल्हास पवार ‘ म्हणून मानपत्र देऊन कलावंतांनी सन्मानित केले. याबद्दल त्यांनी मनोगत व्यक्त करीत कलावंतांचे ऋण व्यक्त केले.सणसवाडी, मोडनिंब, पुणे, जालना व अहिल्यानगर येथील कलावंतांनी पुरस्कार वितरण समारंभा निमित्त आयोजित लावणी महोत्सवात गण,गवळण,मुजरा व लावणी याचे सादरीकरण केले.
