Petrol Diesel Prices | ग्राहकांना मिळणार दिलासा! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले मोठे संकेत

मुंबई : Petrol Diesel Prices | केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Union Petroleum Minister Hardeep Singh) यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत. मागील वर्षभरात सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाच्या किमती कमी केल्या नाहीत. परंतु, खासगी कंपन्या ग्राहकांना प्रतिलिटर 3 रुपयांपर्यंत सूट देत आहेत. जर कच्च्या तेलाच्या किमती सध्याच्या पातळीवर स्थिर राहिल्या, तर इंधनाच्या किमती आणखी कमी होऊ शकतात, असे पुरी म्हणाले.
मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या म्हणण्यानुसार, सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळू शकतो. लोकसभा निवडणुकीच्या आधी 14 मार्च 2024 रोजी पेट्रोल- डिझेलच्या किमती प्रति लिटर 2 रुपयांनी कमी केल्या होत्या. यापूर्वी 22 मे 2022 रोजी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी केले होते, ज्यामुळे पेट्रोलच्या किमती 13 रुपयांनी आणि डिझेलच्या किमती 16 रुपयांनी कमी झाल्या होत्या. तथापि, तेव्हापासून सरकारने कोणताही मोठा निर्णय घेतला नाही. त्यामुळे भविष्यात ग्राहकांना इंधनाच्या किमतीत कपात होण्याची शक्यता आहे का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सध्या सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाच्या किमती कमी केलेल्या नाहीत. मात्र, खासगी कंपन्या प्रतिलिटर तीन रुपयांपर्यंत सवलत देत आहेत. त्यामुळे त्यांचा ग्राहकवर्ग वाढत आहे, तर सरकारी कंपन्या मात्र स्पर्धेत मागे पडत आहेत. सरकार कधी निर्णय घेणार, याकडे देशाचे लक्ष आहे. जर सरकारी तेल कंपन्यांनीही इंधन दर कमी करण्याचा निर्णय घेतला, तर ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.