Pimpri Chinchwad Police | घरफोडीतील चोरीला गेलेले सर्व दागिने परत मिळाल्याने नागरिक भारावले, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा केला सत्कार; ‘पोलीस आयुक्तांची भेट’ उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद
पुणे : Pimpri Chinchwad Police | दिघी परिसरात घरफोडी झाली होती. काही लाखांचे दागिने चोरीला गेले होते. नागरिकाने ते परत मिळण्याची आशा सोडली असताना पिंपरी चिंचवड पोलिसांनी चोरट्याला पकडून चोरीला गेलेले सर्व १०० टक्के दागिने परत मिळविले. चोरीला गेलेले सर्व दागिने पाहून परमेश्वर गिराम हे भारावून गेले. त्यांनी ’पोलीस आयुक्तांची भेट’ या कार्यक्रमात येऊन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा सत्कार केला. सामान्य नागरिकांनी पोलिसांना दिलेली ही कृतज्ञेची पावती पाहून उपस्थितही भारावून गेले.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ’पोलीस आयुक्तांची भेट’ हा विशेष उपक्रम पोलीस आयुक्त कार्यालयातील शिवनेरी हॉल येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, सर्व अपर पोलीस आयुक्त, सर्व पोलीस उपायुक्त तसेच व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व सहायक पोलीस आयुक्त व सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमात ७६ नागरिकांनी उपस्थित राहून त्यांच्या समस्या व तसेच वाहतूक विषयक समस्या व सचुना मांडल्या. त्याचप्रमाणे पिंपरी चिचवड ऑथोपेडिक डॉक्टर असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते़ त्यांनी त्यांच्या समस्या सांगून सूचना मांडल्या. तसेच पोलिसांना मदत करण्याबाबत पुढाकार दर्शविला.
हा कार्यक्रम दर सोमवारी पोलीस आयुक्तालयात दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नागरिक कोणतीही पूर्वपरवानगीशिवाय उपस्थित राहून त्यांच्या समस्या, सूचना मांडु शकतात.
हा उपक्रम दर सोमवारी असाच चालू राहणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमाकरीता पिंपरी चिंचवड शहरातील जास्तीतजास्त नागरिक, औद्योगिक प्रतिनिधी, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच शहरातील अभ्यांगतांनी उपस्थित राहून आपल्या सूचना मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
