Pimpri Crime News | दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करुन परराज्यात पळून जाणार्या अट्टल चोरट्यांना 48 तासात गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने जेरबंद करुन 25 लाखांचे दागिने केले जप्त (Video)
पिंपरी/पुणे : Pimpri Crime News | एकाच दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करुन धुम स्टाईलने परराज्यात पळून जाण्याच्या तयारी असलेल्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने अटक करुन त्यांच्याकडून २५ लाख १३ हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
मोसीन शौकतअली शेख (वय ३२), उदयवीर मलखानसिंग सहासी (वय ३६), आणि विनय कुमार गंगासरन (वय ३४, तिघे रा. मेरठ, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
काळेवाडी, रहाटणी, सांगवी, चाकण जवळील नाणेकरवाडी अशा वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी दिवसभरात घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखा युनिट ३ समांतर तपास करीत होते. पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथक हे पुणे नाशिक महामार्गालगत चाकण जवळील वाकी येथील इंद्रायणी हॉटेलच्या समोर सापळा लावून थांबले होते. त्यावेळी एक पांढर्या रंगाचा टाटा टेम्पो आला. पोलिसांनी संशयावरुन हा टेम्पो थांबविला. तेव्हा त्यातील केबिनमध्ये तिघे जण बसले होते.
पाठीमागे एक विना नंबर प्लेटची दुचाकी गाडी होती. केबिनमध्ये बसलेल्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर करुन तिघांना ताब्यात घेतले. टेम्पोतील बॅगेची पाहणी केली असता त्यामध्ये घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येत असलेले साहित्य मिळून आले. टेम्पोमध्ये विनानंबरची दुचाकी तसेच त्यांच्याजवळ सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा १२ लाख १३ हजार ५९८ रुपयांचा ऐवज जसाच्या तसा मिळाला. तसेच १३ लाख रुपयांचा एक नवीन टेम्पो व दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
त्यांच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केल्यावर त्यांनी आम्ही उत्तर प्रदेशातील मेरठ येथून एका चारचाकी वाहनात दुचाकी टाकून पिंपरी चिंचवड शहरात येतो. वाहन पार्क करुन दुचाकीवरुन फिरुन घरफोडी करुन पोलिसांना थांगपत्ता लागू नये, म्हणून परत १०० ते १५० किमी दुचाकीवर जातो. त्यानंतर निर्जनस्थळी दुचाकी ही टेम्पोमध्ये टाकून मेठरला परत निघून जातो.
या टोळीने कैलाश मुन्ना पंडोल (वय २८, रा. आर्यन विश्व बिल्डिंग, नाणेकरवाडी, ता. खेड) या कांदा बटाटा दुकानदाराचे घर बंद असताना ४ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत घरफोडी केली. घरातील ४ लाख ९९ हजार रुपये, सोन्याचांदीचे दागिने असा एकूण ८ लाख १९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता.
श्रीषा प्रदिप भट (वय ३१, रा. अलंकापूरम सोसायटी, वडमुखवाडी) यांचे घर४ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत बंद असताना चोरट्यांनी दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. ८ लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते.
सुशांत शांतीनाथ चौगुले (वय ३४, रा. रॉयल एलिगन्स सोसायटी, रहाटणी) यांचे घर ४ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या दरम्यान बंद असताना चोरट्यांनी फ्लॅटचे लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला व १ लाख ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. तसेच सांगवी येथे आणखी एक घरफोडी केल्या होत्या़ अशा ४ घरफोड्या करुन ते पळून जात होते.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, सुनिल जावळे, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोर्हाडे, सागर सूर्यवंशी, श्रीधन इचके, संदिप सोनवणे, मनोज साबळे, ऋषिकेश भोसुरे, अजित रुपनवर, स्वप्निल महाले, योगेश कोळेकर, श्शिकांत नांगरे, बाळासाहेब भांगले, सुंदर भोरात, समीर काळे, सुधीर दांगट, दिलीप राठोड, तुषार वराडे, राजकुमार इधारे, निखील फापाळे, प्रदीप राळे, तांत्रिक विश्लेषक प्रकाश ननावरे यांनी केली आहे.
