PM Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा इराणच्या राष्ट्राध्यक्षांना फोन; भारताचा इंधन पुरवठा सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाची चर्चा?
नवी दिल्ली : PM Narendra Modi | पश्चिम आशियातील इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. गेल्या काही दिवसांपासून या युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा विस्कळीत झाला असून, भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर मोदी आणि पेझेश्कियान यांच्यातील ही चर्चा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
या संवादादरम्यान पंतप्रधान मोदींनी प्राधान्याने दोन मुद्द्यांवर भर दिला. पहिला मुद्दा म्हणजे इराणमध्ये अडकलेल्या सुमारे ९,००० भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि दुसरा म्हणजे ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ या सागरी मार्गातून होणारा भारताचा इंधन पुरवठा. इराणने हा मार्ग जवळपास बंद केल्यामुळे भारताकडे येणारी तेलवाहू जहाजे अडकून पडली होती. मोदींनी स्पष्ट केले की, कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा विनाअडथळा पुरवठा होणे ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारतात सुरू झालेली इंधन टंचाई आणि एलपीजी गॅसचा तुटवडा आता कमी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान मोदींनी या संघर्षात होणाऱ्या सामान्य नागरिकांच्या मृत्यूवर आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानावर तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच, कोणत्याही वादावर केवळ ‘मुत्सद्देगिरी आणि संवाद’ हाच एकमेव मार्ग असल्याचे प्रतिपादन करत शांततेचे आवाहन केले.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणमधील भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी किंवा त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी भारतीय दूतावास सातत्याने प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदींच्या या सक्रिय हस्तक्षेपामुळे जागतिक युद्धजन्य परिस्थितीत भारताच्या आर्थिक आणि राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करण्यास मोठी मदत झाली आहे.
