PMC Abhay Yojana | मिळकत कर अभय योजनेला 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ; अभय योजनेच्या दोन महिन्यांत 712 कोटी रुपये थकबाकी जमा, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती
पुणे : PMC Abhay Yojana | महापालिका प्रशासनाने मिळकत कर अभय योजनेला १५ फेब्रुवारीपर्यत मुदतवाढ दिली आहे. १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारीपर्यंतच्या कालावधीत या योजनेअंतर्गत ७१२ कोटी रुपये थकबाकी आणि दंड वसुल झाला आहे. मात्र, निवडणुकीमुळे योजना राबविताना अडचणी आल्याने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
महापालिकेत प्रशासक राज असताना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी अभय योजना राबविली. या योजनेअंतर्गत थकबाकीवरील दंडामध्ये ७५ टक्के सूट देण्यात आली. महापालिकेने प्रथमच निवासी सोबतच व्यावसायीकांसाठी देखिल अभय योजना राबविली. तसेच यापुर्वी अभय योजनेचा लाभ घेतलेल्या मिळकत धारकांनाही या योजनेत सामावून घेतले. मोबाईल टॉवर्सची थकबाकी वगळता सुमारे १८ हजार कोटी रुपये थकबाकी रक्कम असलेल्या मिळकतधारकांसाठी या योजनेचा लाभ होणार आहे. परंतू अभय योजनेच्या कालावधीत केवळ ७१२ कोटी रुपये थकबाकी आणि दंडाची रक्कम वसुल झाली आहे.
अधिकतम अधिकारी वर्ग हा निवडणुकीच्या कामात गुंतल्याने अभय योजना अपेक्षितरित्या राबविता आली नाही. या पार्श्वभूमीवर आचार संहिता शिथील झाल्याने १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. आजवर राबविण्यात आलेल्या अभय योजनांमध्ये सर्वाधिक थकबाकी आताच्या अभय योजनेत जमा करण्यात प्रशासनाला यश आले आहे. मुदतवाढीच्या कालावधीत यामध्ये आणखी भर पडेल, असा विश्वास महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केला आहे.
