Police Personnel Suspended In Pune | साथीदाराला फोन करुन चौकशी केल्याने बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणातील आरोपी झाला होता पसार; अटक करण्यास विलंब झाल्याने पोलीस हवालदाराला केले निलंबित
पुणे : Police Personnel Suspended In Pune | ज्येष्ठ नेते बाबा सिद्धिकी यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेला आरोपी तसेच पंजाब मधील गारमेंट व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणात संशयित असलेल्या आरोपीच्या शोधासाठी पंजाब पोलीस पुण्यात आले होते. यावेळी संशयित आरोपीच्या साथीदाराला फोन करुन चौकशी केल्याने आरोपी सावध झाला. त्यामुळे आरोपीला अटक करण्यास विलंब झाला. यामुळे पोलीस यंत्रणेचा अनावश्यक वापर होऊन पोलीस दलाच्या प्रतिमेबद्दल अविश्वास निर्माण झाल्याने पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी एका पोलीस हवालदाराला निलंबित केले आहे.
पोलीस हवालदार सचिन दिलीप पवार (Sachin Dilip Pawar) असे निलंबित झालेल्याचे नाव आहे.
सचिन पवार हे गुन्हे शाखेच्या युनिट ६ मध्ये कार्यरत होते. गेल्या वर्षी बाबा सिद्धिकी यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध आल्याने पंजाब पोलीसही याचा समांतर तपास करत होते. बिश्नोई गँगने पंजाबातील एका गारमेंट व्यावसायिकाचीही हत्या केली होती. त्यातील गुन्हेगारांशी संपर्कात अमोल गायकवाड हा गुन्हेगार संशयित होता. त्याचा शोध घेण्यासाठी पंजाब पोलीस पुण्यात आले होते. त्यांच्या मदतीला गुन्हे शाखेच्या युनिट ६ ची मदत देण्यात आली होती.
त्यावेळी अमोल गायकवाड याचे लोकेशन शोधण्यासाठी पंजाब पोलिसांनी पोलीस हवालदार सचिन पवार यांना गायकवाड याच्या साथीदाराला फोन करुन त्याच्याशी गोड बोलून गायकवाड याला बोलावून घेण्यास सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे सचिन पवार यांनी वरिष्ठांच्या सांगण्यानुसार गायकवाड याच्या साथीदाराला फोन केला होता. परंतु, त्यामुळे अमाले गायकवाड हा सावध झाला. त्याने आपला मोबाईल फोन बंद केला. तो आपल्या घरी न परतता विविध ठिकाणी फिरत राहिला. शेवटी त्याला कोल्हापूरमध्ये अटक करण्यात यश आले. बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणातील तो अटक केलेला २८ वा आरोपी होता. त्याने चौकशीत फोन आल्याने मी सावध झालो व मोबाईल बंद करुन पळून गेलो असल्याचे सांगितले.
आरोपीशी अत्यंत अव्यवहार्य व संशयास्पद पद्धतीने संपर्क साधल्यामुळे आरोपीने मोबाईल फोन बंद केला. तो विविध ठिकाणी फिरत राहिल्याने त्याला अटक करण्यात विलंब झाला. यामुळे पोलिस यंत्रणेचा अनावश्यक वापर होऊन शासकीय वेळेचा अपव्यय झाला असून पोलीस दलाच्या प्रतिमेबद्दल अविश्वास निर्माण झाला आहे. यामुळे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी पोलीस हवालदार सचिन दिलीप पवार यांना निलंबित केले आहे.
