Police Pravin Ghadge Suspended | आपल्या पदाचा दुरुपयोग करुन पोलीस निरीक्षकांवर दबाव आणणारे पोलीस आयुक्तालयातील जनसंपर्क अधिकारी निलंबित

Police Pravin Ghadge Suspended | Public Relations Officer of Police Commissionerate who misused his position to put pressure on police inspectors suspended

पुणे : Police Pravin Ghadge Suspended |  पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या जवळ असल्याचा गैरफायदा घेऊन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आपल्या पदाचा दुरुपयोग करुन गुन्ह्याचे तपासामध्ये व अर्ज चौकशीमध्ये त्यांच्यावर अवाजवी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलीस आयुक्तालयातील जनसंपर्क अधिकारी यांना गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी निलंबित केले आहे.

सहायक पोलीस फौजदार प्रविण विठ्ठल घाडगे (Pravin Vitthal Ghadge) असे निलंबित केलेल्या पोलीस अधिकार्‍याचे नाव आहे. सध्या ते भरोसा सेल मध्ये कार्यरत होते. त्यांच्याकडे जनसंपर्क अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.

याबाबत पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले की, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेण्यासाठी दररोज अनेक नागरिक येत असतात. अशा तक्रार घेऊन येणार्‍या नागरिकांच्या अर्जाबाबत प्रविण घाडगे हे परस्पर संबंधित चौकशी अधिकारी व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना आपल्या पदाचा दुरुपयोग करुन त्यांना फोनद्वारे संपर्क साधून गुन्ह्याचे तपासामध्ये व अर्ज चौकशीमध्ये त्यांच्यावर अवाजवी दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काहीही सांगितले नसताना अशा अर्ज चौकशी प्रकरणात जनसंपर्क अधिकारी या पदाचा गैरवापर करुन ते पोलीस आयुक्त यांनीच सांगितले आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी व चौकशी अधिकार्‍यांना भासवून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत होते.

ही बाब समोर आल्यानंतर सहायक पोलीस आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात आली. त्यात वरिष्ठांना अवगत न करता परस्पर संबंधित गुन्ह्यातील तपास अधिकारी व अर्ज चौकशी अधिकारी यांना फोनद्वारे आपल्या पदाचा गैरवापर करुन गुन्ह्याच्या तपासात व अर्ज चौकशीमध्ये अनावश्यक ढवळाढवळ करुन अवाजवी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे वर्तन हे पोलिसांकडून आरोपी विरुद्ध करण्यात येणार्‍या कायदेशीर कारवाईला बाधा आणणारे, कर्तव्यावर बेजाबदार, बेफिकीर व जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलिन व नैतिक अध: पतनाचे गैरवर्तन व पोलीस दलाच्या हितसंबंधास अपाय करणारे तसेच शासकीय सेवकास अशोभनीय असे गंभीर स्वरुपाचे वर्तन केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सहायक पोलीस फौजदार प्रविण घाडगे यांना निलंबित केले आहे.

You may have missed