Police Recruitment Pune | 1 लाख 85 हजार उमेदवारांची 1 हजार 733 जागांसाठी CCTV, बायोमेट्रिक अन् फेस रिडिंग अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे 16 फेब्रुवारीपासून पोलीस भरती होणार सुरु

Pune Police Recruitment 2026 | Police recruitment in Pune City Police Force begins; 1.85 lakh applications for 1633 posts

पुणे : Police Recruitment Pune | सीसीटीव्ही, उमेदवानांचे बायोमेट्रिक अन फेस रिडिंग अशा अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन पुणे शहर पोलीस दल व कारागृहातील १ हजार ७३३ जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया १६ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. या जागांसाठी तब्बल १ लाख ८५ हजार अर्ज आले आहेत. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक २च्या मैदानावर पोलीस भरतीची मैदानी चाचणी होणार आहे.

या भरतीत पोलीस अंमलदार, १०५ वाहनचालक आणि ३३ पोलीस बँडसमन अशा एकूण १६३३ पदांचा तसेच कारागृह पोलिसांच्या १३० पदांचा समावेश आहे. मैदानी व शारीरीक चाचणीला १६ फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. या चाचणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा घेतली जाणार आहे. भरती प्रक्रियेचे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने जाहीर केले जाणार असून उमेदवारांना संबंधित सूचना अधिकृत संकेतस्थळ आणि संदेशाद्वारे दिल्या जाणार आहेत.

शारीरिक चाचणीत उमेदवारांची उंची व छाती मोजणी, १०० मीटर धावणे, १६०० मीटर धावणे(महिलां उमेदवारांसाठी ८०० मीटर) आणि गोळा फेक अशा घटकांचा समावेश असेल. या चाचणीसाठी १०० गुण असून त्यात किमान ५० गुण मिळवणे आवश्यक राहणार आहे.

भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी संपूर्ण शारीरिक चाचणी ‘आरएफआयडी’  (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि सीसीटीव्हीच्या निगराणीखाली घेण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांची उपस्थिती, धावण्याची वेळ आणि चाचणीतील कामगिरी अचूक नोंदविता येणार आहे़ या प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेपाचा प्रश्नच उद्भवत नाही.

लेखी परीक्षेच्या टप्प्यातही विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. अधिकार्‍यांना मोबाइल वापरण्यास किंवा बाह्य संपर्क साधण्यास मनाई करण्यात येणार आहे. परीक्षेच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवून गैरप्रकारांना थारा देण्यात येणार नाही.

उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, कोणी पैशांची मागणी केल्यास अपर पोलीस आयुक्त (7391082611) किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी केले आहे.

ड्रग्ज अथवा औषधांचा गैरवापर रोखण्यासाठी ब्लड टेस्ट सॅम्पल, तसेच टॉयलेटचा वापर करून होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी बायोमेट्रिक तपासणी केली जाणार आहे. यंदा पहिल्यांदाच प्रत्येक राऊंडनंतर बायोमेट्रिक आणि फेस रिकग्निशन सिस्टिम वापरल्यामुळे चेस्ट नंबर बदलण्याचे प्रकार पूर्णपणे थांबणार आहेत. लेखी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका ऐनवेळी तज्ञ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत तयार केली जाणार असून, ही प्रक्रिया व पेपर तयार करणे सीसीटीव्हीच्या देखरेखीखालीच होणार आहे. एकूणच तंत्रज्ञानाचा वापर करून यंदाची पुणे पोलिस भरती अधिक पारदर्शक व विश्वासार्ह केली जाणार आहे, असे अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी सांगितले.

You may have missed