Policeman Suicide Case | ‘तुला कुडाळला यावेच लागेल, मी जीवन संपवीत आहे’, मित्राला मॅसेज पाठवून पोलिसाची गळफास घेत आत्महत्या

Kudal-Crime

सिंधुदुर्ग : Policeman Suicide Case | पोलीस कॉन्स्टेबलने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सूरज अनंत पवार (वय-३१, रा. मळगाव-कुंभार्लीवाडी, ता. सावंतवाडी) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. ही घटना सोमवार (दि.७) दुपारच्या सुमारास ते रहात असलेल्या केळबाईवाडी येथील रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्समध्ये उघडकीस आली. पवार यांनी आत्महत्येपूर्वी त्यांच्या मित्राला ‘मेसेज’ पाठवला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज पवार कुडाळ पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल होते. ते काही महिन्यांपूर्वी आवळेगाव दूरक्षेत्र पोलिस चौकीतून कुडाळ पोलिस ठाण्यात हजर झाले होते. ते कुडाळमधील रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्समध्ये एकटेच राहत होते. दुपारी त्याच्या मित्राच्या मोबाईलवर त्यांनी ‘तुला कुडाळला यावेच लागेल, मी जीवन संपवीत आहे’, अशा आशयाचा मेसेज पाठवला.

त्या मित्राने याची कल्पना त्यांच्या मळगाव येथील भावाला दिली. ते तातडीने कुडाळला आले. राहत असलेल्या फ्लॅटवर गेले असता बाहेरून लॉक होते परंतु, चावी बाहेर ठेवलेली होती. त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता सूरज पंख्याला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरनी मृत घोषित केले.

त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. ते मळगाव-कुंभार्लीवाडी (ता. सावंतवाडी) येथील मूळ रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन वर्षांचा मुलगा, आई, भाऊ, वहिनी आणि पुतण्या असा परिवार आहे. पोलिस उपविभागीय अधिकारी कांबळे यांनी याप्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात तातडीने भेट देत माहिती घेतली. पोलिस उपनिरीक्षक माने अधिक तपास करीत आहेत.

You may have missed