Porsche Car Accident Pune | कल्याणीनगर पोर्शे कार अपघात: रक्ताचे नमुने बदलणं भोवलं, डॉ. तावरे आणि डॉ. हळनोर यांचे वैद्यकीय नोंदणी परवाने रद्द

पुणे: Porsche Car Accident Pune | कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात रक्त नमुने बदलणं डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware) आणि श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Halnor) यांना चांगलंच भोवलं आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने या दोन्ही डॉक्टरांचे परवाने रद्द केले आहेत. यापुढे दोघांनाही कोणत्याही रुग्णांवर उपचार करता येणार नाहीत.
दोन्ही डॉक्टरांवर अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलविल्याचा आरोप आहे. त्यानंतर या दोन्ही डॉक्टरांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. तसेच दोन्ही आरोपी डॉक्टरांचे वैद्यकीय परवाने निलंबित करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला पत्र लिहिले होते. त्यानंतर आज महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने डॉ. तावरे आणि डॉ. हळनोर यांची वैद्यकीय नोंदणी निलंबित केल्याची माहिती प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या मुलाने कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडले होते. यावेळी या अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केले होते. मात्र त्याच्या अल्कोहोल टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह यावा, यासाठी ससूनमधील दोन वरिष्ठ डॉक्टरांनी या धनिकपुत्राचे रक्ताचे नमुनेच बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.