Prathamesh Abnave News | निवडणुकीच्या तोंडावर पुणेकरांची मेट्रो बिहारला पळवली ! पुण्यासाठी राखीव मेट्रो गाडी पाटणा मेट्रोसाठी दिली भाडेतत्वाने; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

Prathamesh Abnave

पुणे: Prathamesh Abnave News | बिहारची निवडणूक तोंडावर असल्याने मतदारांना खुश करण्यासाठी पुण्याची मेट्रो बिहारला पळवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणुकीपूर्वी पाटणा मेट्रो सेवा सुरु करण्यासाठी महामेट्रो रेल कॉर्पोरेशनने राजकीय दबावाला बळी पडत पुण्यासाठी राखीव असलेली मेट्रो गाडी तीन वर्षांच्या भाडेकरारावर बिहारला दिल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी केला आहे. ही मेट्रो गाडी तात्काळ पुण्यात परत आणली नाही, तर महामेट्रो कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आबनावे यांनी दिला.

प्रथमेश आबनावे म्हणाले, “शहराच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पुणे मेट्रो अधिक सक्षम व विस्तारित करण्याची गरज आहे. आजघडीला दररोज सरासरी १.८० लाख प्रवासी मेट्रोचा वापर करीत आहेत. गाड्यांची वारंवारिता वाढवण्यासह प्लॅटफॉर्मवरील गर्दी आणि नव्याने सुरु होणाऱ्या मेट्रो मार्गिका यांसाठी राखीव गाड्यांची उपलब्धता असणे गरजेचे आहे. मात्र, पाटणा मेट्रोला ट्रायलसाठी सध्या स्वतःची मेट्रो ट्रेन नसल्याने पुण्याची ट्रेन तिकडे पाठवण्यात आली. हा निर्णय घेताना पुण्याचे खासदार, आमदार, पालकमंत्री किंवा नागरी प्रतिनिधीना विश्वासात घेतले का? हा प्रश्न आहे. तसेच भाडेकराराच्या अटी नेमक्या काय आहेत?, पुण्यासाठी नवीन ट्रेन संच कधी येणार आहे आणि बिहारला दिलेली मेट्रो ट्रेन परत येणार आहे का? याबाबत आम्हाला शंका आहे.”

“पुणे मेट्रोसाठी आवश्यक असलेल्या ३४ मेट्रो ट्रेन संचांपैकी एक राखीव संच (तीन डब्यांची मेट्रो ट्रेन) महामेट्रो रेल कॉर्पोरेशनने पाटणा मेट्रो प्रकल्पासाठी भाडेतत्वावर पाठवला आहे. सदर ट्रेन आता बिहारमधील गीतागड येथील डेपोत आहे. त्यामुळे आता फक्त ३३ संच पुणे महामेट्रोकडे उपलब्ध आहेत. इथे मेट्रो ट्रेनची गरज असताना बिहारला मेट्रो ट्रेन पाठवणे अयोग्य आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुण्याच्या विकासावर घाला घालण्याचा हा प्रकार आहे. ही मेट्रो बिहार निवडणुकीपूर्वी सुरू होणाऱ्या मेट्रोसेवेचे श्रेय घेण्यासाठी पळवण्यात आली आहे,” असा आरोप त्यांनी केला.

पुण्याची मेट्रो सेवा अजून अपूर्ण आहे. प्रवासीसंख्या वाढत आहे. नवीन मार्ग सुरू होणार आहेत. अशावेळी ही मेट्रो बिहारला पाठवणे म्हणजे पुण्याच्या विकासाला मागे टाकणे आणि बिहारसारख्या राज्याच्या राजकीय अजेंड्यासाठी महाराष्ट्राच्या लोकसेवेला दुय्यम स्थान देण्यासारखे आहे.

  • प्रथमेश आबनावे, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

You may have missed