Prathamesh Vikas Abnave | महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी प्रथमेश विकास आबनावे यांची निवड

Prathamesh Vikas Abnave | Prathamesh Vikas Abnave elected as Vice President of Maharashtra Pradesh Youth Congress

पुणे: Vikas Abnave |  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत आक्रमक व अभ्यासपूर्ण नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या प्रथमेश विकास आबनावे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रभारी मनीष शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब, महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा, सहप्रभारी शांभवी शुक्ला व नवज्योत संधू यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात नुकतीच नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रथमेश आबनावे हे राजकीय कार्यासोबत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ या संस्थेत संचालक व खजिनदार म्हणून ते कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षण, निवास व सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. शहरी विकास व शाश्वत शंकराचा विकास या विषयांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे.

प्रथमेश आबनावे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर विविध प्रश्नांवर आक्रमक आणि संघटित आंदोलन उभारली आहेत. भारत जोडो यात्रा व भारत जोडो न्याय यात्रेत त्यांनी नियोजन व सक्रिय सहभाग घेतला. एमपीएसी विद्यार्थी आंदोलन, अग्निवीर योजनेविरोधातील दिल्ली व पुण्यातील रेल रोको आंदोलन, खडकी (पुणे) येथील रेल रोको, प्रवाशांवरील अन्यायकारक भाडेवाढीविरोधातील लढा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केलेला संघर्ष, तसेच ट्रेड डीलविरोधातील पीएम कॉम्प्रमाईज आंदोलन यामध्ये त्यांनी अग्रभागी भूमिका निभावली आहे. दिल्ली, पुणे, नागपूर आणि मुंबई येथे झालेल्या असंख्य आंदोलनांतून त्यांनी युवकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडत काँग्रेसची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवली आहे. विविध निवडणुकांमध्ये युवक काँग्रेसच्या डोअर-टू-डोअर मोहिमेद्वारे विक्रमी जनसंपर्क साधत संघटना मजबूत करण्याचे कामही त्यांनी सातत्याने केले आहे.

याशिवाय, राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत युवकांमध्ये नेतृत्व, संवादकौशल्य आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन सत्रे, संवाद उपक्रम आणि प्रेरणादायी कार्यक्रम राबवले आहेत. नव्या पिढीला सामाजिक व राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने त्यांचे हे कार्य विशेष उल्लेखनीय मानले जाते. आबनावे यांनी आपल्या यशामागे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांचे मार्गदर्शन, तसेच कुटुंबियांची साथ मोलाची असल्याचे अधोरेखित केले.

या निवडीबद्दल प्रथमेश आबनावे यांनी कृतज्ञता व्यक्त करत “माझ्या वडिलांच्या ६८ व्या जयंतीच्या दिवशीच ही निवड झाल्याने हा क्षण अधिक भावनिक आहे. ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मान व संधी आहे. सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. धर्मनिरपेक्षतेचा विचार, महात्मा गांधींची शिकवण, सातत्य, संघर्ष आणि निष्ठा या मूल्यांवर उभे राहून काम करण्याचा माझा निर्धार आहे. देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मांडलेले तरुणांचे प्रश्न आणि त्यासाठीची लढाई अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना मिळालेली संधी हीच माझी प्रेरणा आहे.”