Pune ACB Trap | गाडी जप्त न करण्यासाठी लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षकाला ACB ने सापळा रचुन केली अटक
पुणे : Pune ACB Trap | दाखल झालेल्या गुन्ह्यात गाडी जप्त न करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ३५ हजार रुपये स्वीकारताना पौड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.
सचिन बाळासाहेब शिंदे Sachin Balasaheb Shinde (वय ४५, रा. ग्रीन फ्लोरेन्सइया सोसायटी, सुसगाव, ता. मुळशी) असे या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
याबाबत एका ४५ वर्षाच्या नागरिकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार याच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यानंतर मुळशीमध्ये दोन गटात हाणामारी झाली होती. दोन्ही गटाने परस्परविरोधात गुन्हे दाखल केले होते. तक्रारदार यांच्याविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे याच्याकडे होता. या गुन्ह्यात गाडी जप्त न करण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी तक्रारदार यांना सचिन शिंदे याने १ लाख रुपयांची लाच मागितली. याची तक्रार १८ फेब्रुवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. या तक्रारीची शुक्रवारी २० फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात सचिन शिंदे याने तक्रारदार यांना १ लाख रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती पौड पोलीस ठाण्यात ३५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूरचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या नेतृत्वाखाली पौड पोलीस ठाण्याच्या मुळशी बीट ऑफिसमध्ये शुक्रवारी सायंकाळी सापळा लावण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सचिन शिंदे याला रंगेहाथ पकडण्यात आले. पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन सचिन शिंदे याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली. पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे तपास करीत आहेत.
तक्रारदार यांनी कारवाईसाठी पुण्याबाहेरचे पथक असावे , अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूरच्या पथकाने ही संपूर्ण कारवाई यशस्वी केली आहे.
